Friday, July 22, 2011

Happy Birthday Smarty




तू म्हणालास, म्हणून खर तर कविता केली
अन् मित्रा, बघ आज त्या कवितेला किती फूलं आली ...

आज तू जर का ती कविता पाहशील,
तर तासन् तास त्या फुलांकडे बघत राहशील ..

सकाळच्या कोवळया उन्हात जेंव्हा
शब्दांची पिवळी धमक फूलं हसतील,
तेंव्हा तू देखील त्यांच्यासारखाच मोहरून जाशील

मध्यान्हिच्या रखरखीत वेळी
त्यांना उदास झालेले बघून
तूही त्यांच्यामधलाच एक शब्द होवून अक्षर अक्षर तापशील..

संधिप्रकाश पांघरून जेंव्हा
अर्थांची पाखरं घरी येतील,
तेंव्हा फुलांचे आतुर भाव दाखवायला तू लहान मुलासारखा सगळ्याना जमवशील..

जेंव्हा थकलेला दिवस, थबकलेला वारा अन् बोलकं चांदण
त्या फुलांपाशी येवून टेकतील
तेंव्हा आयुष्यावर गप्पा मारताना तू देखील त्यांच्याबरोबर रात्री जागवशील .....

का कुणास ठावुक पण मला वाटत
ज्या मातीत ती कविता रुजली, तिच्या चांगुलपणाशी तुझं काहीतरी नातं असावं...

म्हणुनच कदाचित, तू म्हणालास, तेंव्हा कविता केली..
अन् मित्रा,
बघ आज त्या कवितेला किती फूलं आली ...

-- शंतनू
२२ जुलै, २०११
(स्मार्टीस वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा)
कलाविष्कार: अक्षय टोणपे आणि गिरिजा कडलासकर