Saturday, November 5, 2011

नजरे करम फरमाओ...






आज जगजीतची खूप आठवण येत आहे...त्याचा 'दरबारी' आज सकाळपासून पाठ सोडतच नाहीये..त्याच्या गज़ला ऐकून रात्री रंगल्या पण आज कलंदर दिवसा जगणं मुश्किल करतोय..



"ये दौलत भी लेलो ये शोहरत भी लेलो " म्हणत जगजीतने बालपणीच्या त्या रम्य आठवणी ताज्या केल्या..डोळ्यात पाणी आणलं! "होशवालोंको खबर क्या बेखुदी क्या चीज है .." या त्याच्या शब्दांनी आम्हाला कोवळया वयात मोहिनी घातली.."चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है.." हे इतक्या वेळा ऐकलं कारण आमच्या संवेदनेला ते स्पर्श करून गेलं ...तिथे शब्दांचा पसारा नव्हता ...सुरांनी उचलून धरलेल्या त्या शब्दांचा फुलाच्या पाकळयांसारखा शिडकाव झाला...त्यांना कधी मोग-याचा गंध होता तर कधी रातराणीचा सुवास.."सबके नजरोमे हो साकी ये जरुरी है मगर, सबपे साकी की नजर हो ये जरुरी तो नहीं" या शब्दांची आर्तता आमची वाटली.."शेख करता तो है मस्जिदमे ख़ुदाके सजदे, उसके सजदोमे असर हो ये जरुरी तो नहीं" ही ओळ जेंव्हा आली तेंव्हा अंगावर आलेला काटा हा टाळयांचा गजर ऐकून आला की त्या ओळी मधली खिन्नता चटके देवून गेली म्हणून होता हे कळलेदेखील नाही.."कोई पास आया सवेरे सवेरे, मुझे आज़माया सवेरे सवेरे" हे ऐकून आम्ही भारावून गेलो.."कटी रात सारी मेरी मैकदेमे, ख़ुदा याद आया सवेरे" ही आम्हाला आमच्याच आयुष्याची कथा वाटली.. तिथे मी, मी उरलो नाही..जो रात्रभर मयखान्यात होता तो कोणी एक "मी" नव्हताच मुळी! भावनांचा डोलारा आम्ही सांभाळत असतानाच त्यानं "बाबुल मोरा नैहर छूटो जाय " गायलं ... आम्हाला सावरू दिलच नाही..आम्ही नशेतच राहिलो..आणि मग "ठुकराओ अब के प्यार करो मे नशेमे हु" या शब्दांनी नशा वाढतच गेली..आम्ही आयुष्यभर त्यातून बाहेर पड़णार नाही हयात वाद नाही..

हा 'दरबारी' इतका का त्रास देतोय? तो का इतका आवडला?..त्याचा "कोमल ग" वेड लावतोय का जगजीतचा वेगळ्या दुनियेतील आवाजच कारणीभूत आहे?.का ही हुरहुर म्हणजे तो दरबारी मित्रांबरोबर ऐकला होता त्या अविस्मरणीय अनुभूतीची निशाणी असावी? ....

मी खुप गाण ऐकलं आहे ...ऐकत राहीन..कोणतही गाणं ऐकताना मी कोणत्या दुनियेत जातो हे शोधायचा मी प्रयत्न करतो ... जगजीतचं गाणं ऐकतो तेंव्हा ती दुनिया, ते जग स्पष्ट होत नाही..तो फ़क्त भूतकाळ नाही..तिथे मी एकटा असतो..माझ्या संवेदना अस्पष्ट होतात....जाणिवा अबोध होतात.. अर्थ आणि अर्थातीत या सीमेवर मी उरतो..उदासीनता भरून राहते. मी त्या जगाचं शब्दात वर्णन करू शकत नाही..जेंव्हा तो गायला तेंव्हा तो माझ्या त्या जगताच वावरला होता का?..अर्थाला सुरांनी गुम्फत तो अर्थाच्या पलिकडे गेला तेंव्हा तीच दुनिया त्याला दिसली होती का? "लुटला गेलो तरीही सुर थोड़े राहीले...शब्द थोड़े दे मला अन् आज मजला गावू दे.." ही जाणीव त्याला शेवटचा "सा" लावला तेंव्हा झाली असेल का?...

आज त्याच्या दरबारीच्या सुरामध्ये ह्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न केला आणि जाणवलं की त्या सुरांमध्ये हरवून जाताना हे प्रश्नच विरून गेले आहेत...

त्याच्या गाण्याच्या शैलीपेक्षा त्यानं गायलेलं हे थोड्या वेगळ्या शैलीच गाणं ...

जगजीत, तू या 'दरबारी' मध्ये घेतलेल्या ताना आणि आलाप यांनी आज मला पछाड़लय...म्हणून एकदा, या सुरांसाठी तरी, "नजरे करम फरमाओ, गौर करम बरसाओ.."

--शंतनू
५ नोव्हेम्बर, २०११