Thursday, September 20, 2012

पुरिया धनश्री

मित्रा,




तू गाणी पाठविल्यानंतर ती एक एक करून ऐकण्याचा श्रवणीय अनुभव घ्यायला सुरुवात केली. वेळ मिळेल तसे जवळ जवळ प्रत्येक गाणे दोनदा ऐकले. तिघिंच्याही आवाजबद्दल काय बोलावे? 'वाट एकाकी तमाची" मधल्या 'एकाकी' वर धरलेल्या सुराच्या एकटेपणाबद्दल खंत करत रहावे का पुढच्याच 'वद जाऊ कुणाला शरण" पदामधे 'शरण' वर सुरुवातीलाच केलेल्या अगतिक लयकारीला प्रतिसदात्मक दाद द्यावी? वाहवा येत गेली, एक निराळी मैफील अपनेआप जमत गेली. अजुनही चालूच आहे ती तशी. आणि तरी देखील 'पुरिया धनश्री' ऐकायचा मी राखून ठेवला होता. तसे त्याचे खास कारण देखील होते. लोकं गोष्टी का राखून ठेवतात? कर्णाने वैजयंती का राखून ठेवावी? सचिनने १०० का राखून ठेवावी? वसंतरावांनी मारवा का राखून ठेवावा? आमिर ने तलाश ..का? तू मला जेंव्हा सांगितलेस की पुरिया धनश्री च्या सुरांनी तुला जखडून ठेवले होते, भूतकाळ
त नेले होते. तो अनुभव त्या क्षणांच्या पातळीवर गेल्याशिवाय येणार नाही असे मला वाटले. 'सिंहगडावरचे ताक कुठेच मिळत नाही' असे आपण म्हणतो तेंव्हा त्यात ताकाचे कौतुक असतेच पण ते ताक खालुनच वर नेले असते ना? पण खरी चव येते ती सिंहगड चढून जाण्याची. शास्त्रीय संगीताचे तसेच आहे. भावनांचे डोंगर ओलांडून वरती पोहोचल्यावर सुरांचे ताक अमृत न वाटेल तरच नवल. आपल्याला हां अनुभव नवा नाही. १९१३ मधले पहाटे पाच वाजताचे "बाबुल मोरा" आठवते? अगदी काल परवाच तुला हा अनुभव परत आला. म्हणुनच अशा क्षणांची मी वाट बघत होतो. आता वाट बघुनही ते चटकन येतीलच असेही नाही. इंद्रियांचे हांडे घेवून महातीरावर जावे तर ही अबोल गंगा कुठल्याश्या खेड्यातून गावओढ्याला मिळालेली असते. नशीब नावाचा छोटा प्रकार हाच असतो. नाही तर स्मार्टी गणेशमूर्ती हाताने घडवताना आपण तिथे नसावे ह्यामागे काय सायंस? पण गमतीचा प्रकार म्हणजे असा योग लगेच आला. 'पुरिया धनश्री' निसटुन जाइल असे म्हणता म्हणता तो आला.



काल घरी गणपतीची सुन्दर आरास केली, पूजा झाली. मूर्ती सजली. मंत्र घुमले. संध्याकाळी वीस पंचवीस माणसे आरतीला आली. आरती अशी जोरदार झाली की बाप्पा खुश! नवीन चेहरे भेटले. ओळखी झाल्या. विनोद पसरले. एकुण "सगळे आले होते" कार्यक्रम झाला. एक एक जण 'उद्या भेटू' म्हणत चलता झाला. आणि कुणाला तरी भेटायचे म्हणून माझा रूममेट देखील योगायोगाने कुठेतरी गड़प झाला. अन्यथा गप्पा होतात. पण एकदम घरात शांतता झाली. मी दिवे बंद केले आणि आता फ़क्त गणपति समोरच्या समईचा प्रकाश. आणि रस्त्यावरचा नीरव! बाप्पाकड़े पाहीले तर डोळे खिळतील अस गोजिरे रुपडे दिसत होते आणि मला एकदम सुचलं! मी तुझा "पुरिया धनश्री" लावला. तिघिंची गाणी आवडली असली तरी मला असे वाटल होतं की तुझ्या शेजारच्या मुलीचं गाण थोड़ पुढ़ गेलं आहे. बाकीच्या दोघी सुरांवर हुकूमत गाजवत आहेत तर ती सुरांना आपलस करून गात आहे. म्हणून पुरिया धनश्री तिनच गायला असावा अशी इच्छा मनात आली. आणि जेंव्हा तिनच कोमल रिषभ लावला तेंव्हाच कळल की सिंहगडाचा पायथा आला आहे महाराजा!. नंतरची वीस मिनिटे मी कुठे होतो ते सांगण अवघड आहे मित्रा. निर्गुणातुन सगुणात आलेल्या त्या विघ्नहर्त्याच्या मोहक डोळ्यांची कमाल होती की 'पायलिया झनकार मोरी" च्या सुरांची ते माहित नाही. पण उदबत्तिचा धूर ज्या लयीने वर चालला होता त्याच लयीने सूर कानावर पडत होते. मग सुगंध कशाचा येत होता? अजुन खुप सुन्दर 'पुरिया धनश्री' असतील पण तुझी थाप कानावर येत होती ती इथेच. खुपच सुन्दर आवाज लागला आहे तिचा या गाण्यात. मी नुकताच हरवलो होतो आणि तिने तराणा चालू केला. का? थांब, थांब! ....



गाणं संपले आणि मी ईमेल लिहायला घेतली. रिप्लायवर क्लिक केलं आणि तुझा फ़ोन वाजला. आता काय म्हणावे याला? आत्ता रात्री एक वाजता तू मला का फोन करावास?



आज सकाळी गणपतीकड़े पाहताना तुझ कालचे वाक्य आठवले 'अरे काय सांगतोस, आय विल स्टार्ट बिलीविंग इन गॉड'



शन्त्या