Wednesday, July 9, 2014

माईस (राहून गेलेले) पत्र

प्रिय माईस,

शिर साष्टांग नमस्कार 

आज शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर २०१०. तुला पत्र लिहायला घेतले खरे पण मायना लिहितानाच विचार काहीसे हरवल्यासारखे झाले. डोळ्यात पाणी आणून पत्र लिहायची खरे तर ही माझी पहिली वेळ नाही. अमेरिकेत आल्यावर प्रथम घरी पत्र लिहिताना असेच काहीसे झाले होते. त्यानंतर पत्रे जास्त लिहिली नाहीत. जी पत्रे मला आली ती तुझीच होती. मला तिकडून पत्र आलेले पाहून मी मित्रांना गमतीने सांगायचो की पुण्यात माझी एक ऐंशी वर्षाची मैत्रीण आहे ती मला प्रेम पत्र लिहित असते म्हणून!  तुझ्या अनेक पत्रांना उत्तर म्हणून इतक्या वर्षात तुला मी एकही पत्र लिहिले नाही म्हणून आज खूप चुकल्या सारखे वाटत आहे. एक अपराधीपणाची म्हण किंवा हातातून काहीतरी निसटल्याची आगंतुक भावना सकाळ पासून मनात घर करून आहे. "स्वदेस" चित्रपटातल्या मोहनला कावेरी अम्माची आठवण व्हावी तसे! मला माहिती आहे की तू हे वाचशील तर तुला नक्की समजेल. कारण तू जुन्यातली जुनी आणि नव्यातली नवी आज्जी आहेस.

"माई" या तुझ्या नावातच तुझ सगळ आज्जीपण भरलं आहे. आज्जीपणच नव्हे तर तुझी सगळी माया भरली आहे. नानांची माई, प्रकाश मामा,विलास मामा, आनंद मामा, आणि अरुणाची  माई, नातवंडांची आणि पत्वान्डांची माई. सगळ्यांची माई. 'हाय कमांड' माई. सगळ्यांना धरून चालणारी, सगळ्यांवर अतोनात प्रेम करणारी माई. हक्काची माई. हक्क गाजवणारी माई. महाभारतातल्या त्या महान पृथेसारखी, पत्नी, आई, अशा असंख्य नात्यामध्ये आदर्श स्त्री म्हणून शोभणारी प्रेमाची आणि ज्ञानाची चालती बोलती मूर्ती. तुझ्या लाडक्या जावई बापूंच्या शब्दातच सांगायचे झाले तर माई नावाचे विद्यापीठ!  

तुझ्या या  सगळ्या "माई" रूपांमध्ये मला खूप भावली ती "अरुणाची" माई. कारण त्या माईला मी जवळून पाहिले. आई-मुलीच्या नात्याच्या खूप पुढे जावून फुललेलं तुमचं मैत्रीचं नातं किती  स्वाभाविकरित्या सुंदर होतं! तुम्हा दोघीमधलं प्रेम, तू आईला तुझ्या खास "स्टाइल" मध्ये समजावून सांगितलेल्या संसारातील बारीक सारीक पण महत्वाच्या गोष्टी, तुमच्यातील न संपणारे छोटे छोटे वाद, रुसवे फुगवे, आणि कितीही झालं तरी शेवटी "हि माई म्हणजे ना" किंवा "काय ग्रेट बाई आहे हि माई " अशी आईची ठराविक छापातली ऐकू येणारी वाक्ये.  या सगळ्या गोष्टी फक्त एका नातवाच्या नव्हे तर एका सूक्ष्म निरीक्षकाच्या नजरेतून आम्ही तिन्ही भावंडांनी पाहिल्या आहेत, त्यांची मजा अनुभवली आहे. तुझ्यावर होणाऱ्या विनोदांवर खळखळून हसलो आहे. तुझ्याच पुण्याईच्या बळावर वाढलो आहे.   

आज पत्र लिहिताना मी वेढला गेलो आहे त्या आठवणींच्या असंख्य  लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी. माझ्या प्रत्येक इंडिया ट्रीपच्या पहिल्या दिवशी मला (आईच्या भाषेत "धडपडत") भेटायला येणारी माई मला आठवतीय. "म्हणा हो सतीशराव शनिवारवाडा," "अरे दादा म्हण चटकन ते गाणं," "विलास दे रे पोराच्या हातात काहीतरी, मी देते तुला नंतर," "आमची आरती फार हुशार हो,"  "अरुणा उगाच काहीतरी बोलू नकोस"  असे तुझे असंख्य डायलोग्स आज माझ्या कानाभोवती रुंजी घालत आहेत. दृष्ट काढताना तुझा होणारा चेहरा इतका स्पष्टपणे माझ्या डोळयासमोर आहे की आयुष्यात मला कसलीही भीती वाटली की मी लगेच तो चेहरा डोळ्यासमोर आणेन. मला खात्री आहे की कोणतीही वाईट गोष्ट कधीच माझ्या वाटेला जाणार  नाही. माई, लग्नानंतर तुला भेटायला आलो असता, तुझ्या थरथरणाऱ्या हातांचा झालेला स्पर्श आता देखील खूप जिवंत आहे आणि तुला आईसक्रीम खायला घालताना मला वाटलेलं समाधान आताही विलक्षण ताजं आहे. तुझ्या कौतुकाची सर अजूनही सरली नाहीये. मी विचार करतो आहे की तुला हे पत्र वाचून दाखवताना आईला किती मोठ्यानं बोलावं लागलं असतं.  गेली काही वर्षे, तुला ऐकू जावे म्हणून आम्हा सगळ्यांनाच मोठ्या आवाजात बोलावे लागले पण आता असं वाटतंय की ते तुला ऐकू येत नव्हते म्हणून नव्हे तर तुझ्या मोठेपणामुळे होते. तुझ्यासारख्या आयुष्याला जिंकलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे आमच्या सारख्यासाठी कठीणच! तुला आठवतंय माई, तुला भेटायला आल्यावर तू आम्हाला नानांच्या फोटोला नमस्कार करायला सांगायचीस. त्यामागचा कळवळा आम्हाला तेंव्हा जाणवेल जेंव्हा उद्या आमच्या पोरांना आम्ही तुझ्या फोटोला नमस्कार करायला सांगू.

माई तू मला तुझ्या पत्रांमधून भरपूर मार्गदर्शन केलेस. तुझी पत्रे  ओव्या, उदाहरणे, अलंकार यांनी भरभरून आली. त्यात कौतुक आणि आशीर्वाद तर होतेच पण त्याशिवाय सरलेला अनेक वर्षांचा भूतकाळ आणि येणारा अनेक  वर्षांचा भविष्यकाळ यांना जोडणारे अदृश्य धागे होते.  तुझ्या शब्दांमधले हे काळाला छेद देणारे वैशिष्ट्य हि कदाचित तुझ्या अपरमित भक्तीचीच देणगी असेल. तुझ्या ज्ञानोबा माउलींनी    म्हटल्याप्रमाणे "ऐसे जे मत्पर| उपासिती निरंतर| ध्यानमिषे घर | माझे झाले||," तू माउलीमय  झाली होतीस. "यालागी पांगुळा हेवा| नव्हे वायूसि पांडवा| तेवी देहवंता जीवा| अव्यक्ती गती||." आज व्यक्तिरुपाला त्यागून तू अव्यक्त स्वरुपात त्यांना भेटली असशील तेंव्हा त्यांना किती आनंद झाला असेल. "प्रेमाची पेटी| बांधली एकाचे पोटी| मग आणिले तटी| सायुज्याचिया||"  त्यांच्या या अभंगाची तुझ्या भेटीमधून पूर्तता झाली असेल. प्रेमाची जी पेटी त्यांनी तुला बांधली आणि तू आम्हाला बांधलीस तीच आम्ही पुढच्या पिढीला बांधू. माई आम्ही तुझी सगळी नातवंडे नेहमीच एकमेकांना धरून राहू.  

लिहिण्यासारखे खूप काही आहे पण हात थरथरत आहेत. मला प्रश्न पडला आहे जेवढे काही लिहिले त्या पत्रावर काय पत्ता टाकू? पण तसे पाहता त्याची चिंता नाही. मला विश्वास आहे की शब्दांची पाखरं न टाकलेला पत्तादेखील शोधून काढतील. माझ्या माई आज्जीची मायाच तशी आहे!

तुझा प्रिय नातू

शंतनू
नोव्हाटो, कॅलिफोर्निया, अमेरिका

1 comment:

Unknown said...

अतिशय भावनाप्रधान सुंदर शब्दचित्र नुसती शब्दांची पाखरे नाहीत त्यांना भावनेचे पंख आहेत । आणि शेवटी तो तुझा आतला आवाज आहे ।तो कुठेही पोचू शकतो